मुंबईत तुमची ताकद नाही, म्हणूनच कोणालातरी पकडून; संजय राऊतांचा रोख कोणाकडे
![You don't have the strength in Mumbai, so catch someone; Who owns Sanjay Raut's cash?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/You-dont-have-the-strength-in-Mumbai-so-catch-someone.jpg)
मुंबई|राजधानी दिल्लीत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळं देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. या सगळ्याला भाजप जबाबदार असून या दंगली भाजपने प्रायोजित केल्या असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
देशाच्या दोन प्रमुख शहरांमध्ये ज्या प्रकारे दंग्यांचे वातावरण तयार केलं आहे. हे फार दुर्दैवी आहे. देशाच्या राजधानीत दंगली होत आहेत. हे पहिल्यांदा होत नाहीये. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे स्थानिक निवडणुका होणार आहेत. त्याआधी तुम्ही निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता दंगली केल्या आहेत. हे सगळं त्या निवडणुका जिंकण्यासाठी कोणता मुद्दा नाही म्हणून सुरू आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबईतही तुम्ही हाच तणाव निर्माण केला आहे. मुंबईत तुमची ताकद नाही. त्यामुळं तुम्ही कोणलातरी पकडून हे काम दिलं आहे. तुम्ही भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशाची अर्थव्यवस्था आता कुठे मूळ पदावर येत आहे. पण पुन्हा राजकीय फायद्यासाठी दंगलींचे राजकारण केलं. तर देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही खाली जाईल, संपून जाईल, अशी टाकी राऊतांनी केली आहे. देशातील दंगे सत्ताधारी पक्षानं प्रायोजित केले आहेत, असंदेखील संजय राऊत म्हणाले आहेत
विधानसभा पोटनिवडणूकीत आम्ही एकत्र लढलो ज्याचा परिणाम स्पष्ट दिसला. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. तेव्हा याच फॉर्मुल्यावर आम्ही आगामी निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाऊ, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.