आज उत्तर प्रदेशच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान
![Voting in the last phase of Uttar Pradesh today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Election.jpg)
लखनऊ | उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सातव्या व शेवटच्या टप्प्यातील ५४ जागांसाठी आज, सोमवारी मतदान होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागांचा समावेश असून आजच्या मतदानातून ६१३ उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे.
आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही तसेच सोनभद्र या जिल्ह्यात हे मतदान होत आहे. सत्ताधारी भाजपा तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या दृष्टीने हा शेवटचा टप्पा महत्त्वाचा आहे.
गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाबपेक्षा सर्वात मोठे राज्य म्हणून उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 7 टप्पे निश्चित करण्यात आले होते. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 03 मार्च रोजी या राज्यात मतदान पार पडले. आता 07 मार्चला म्हणजेच आज सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जारी होतील