गणेशभक्तांचा अभुतपूर्व प्रतिसाद; कोकणातील गाड्यांचे आरक्षण फुल्ल
![Unprecedented response from Ganesha devotees; Full reservation for trains in Konkan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/fuyfuf.jpg)
मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे आणि एसटीने खास गाड्यांची सोय केली आहे. त्याला गणेशभक्तांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सोमवारपर्यंत या गाड्यांचे आरक्षण १०० टक्के पूर्ण झाले आहे. आता गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्यामुळे कोकणवासी हवालदिल झाले आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने कोकणातील गणेशभक्तांसाठी १५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे आरक्षणही सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी, पनवेल-सावंतवाडी, पनवेल-रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव अशा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांचे आरक्षण सोमवारी सायंकाळपर्यंत १०० टक्क्यांवर पोहोचले होते. या गाड्यांच्या परतीच्या प्रवासाचे आरक्षणही जवळपास पूर्ण होत आले आहे. एसटीनेही गौरी-गणपतीसाठी कोकणात जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथून एकूण १,०५६ गाड्यांचे आरक्षण रविवार ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण झाले आहे. यात १६० गाड्यांचे समूह आरक्षण, ३७२ गाड्यांचे पूर्ण आरक्षण आणि ५२४ गाड्यांचे काही प्रमाणात आरक्षण झाले आहे. यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.