यशोमती ठाकूरांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे नाराज
![Uddhav Thackeray is upset over Yashomati Thakur's statement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Uddhav-Thackeray-is-upset-over-Yashomati-Thakurs-statement.jpg)
मुंबई|शरद पवार हे चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर राज्याचे चित्र वेगळे असते. कोणी कितीही तीर मारले तरी पवार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्थिर राहील, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते.
यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याची गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे हे नाराज झाले आहेत. हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे आपल्यावरील सूचक भाष्य असून त्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अंतर आहे, असे वाटू शकते, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याचे समजते.
नीलम गोऱ्हेंचा टोला
शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उभसभापती नीलम गोऱ्हे यांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या संमतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यशोमती ठाकूर यांच्या विधानाबाबत मला काही बोलून वाढवायचा नाही. पण यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद करण्यासाठी प्रस्ताव मांडावा, असे सांगत नीलम गोऱ्हे यांनी त्यांची कोंडी केली. शरद पवार यूपीए अध्यक्ष झाल्यास त्याचा उपयोग संपूर्ण भारताला होईल. तेव्हा यशोमती ठाकूर असा प्रस्ताव द्यायला तयार आहेत का, असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी विचारला होता.
यशोमती ठाकूर यांचे स्पष्टीकरण
या सगळ्या वादानंतर यशोमती ठाकूर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे मार्गदर्शन महाराष्ट्राला कायमच हवे असते, असा माझ्या विधानाचा अर्थ असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.