बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला! क्लासच्या शिक्षकाला अटक
![Twelfth grade chemistry paper torn! Class teacher arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Paper-leaked.jpg)
मुंबई | राज्य सरकारच्या नोकरभरतीतील पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता थेट बारावीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विले पार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. मुकेश यादव असे या शिक्षकाचे नाव आहे. विले पार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थिनी परीक्षेला उशिरा आल्याने तिच्या चौकशीदरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा शुक्रवार, ४ मार्चपासून सुरू झाली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेतही पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. शनिवारी झालेल्या बारावीच्या रसायनशास्त्राचा पेपर फुटला. परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर आला होता. मालाडमधील खासगी क्लासेसच्या शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्सऍपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजता हा पेपर सुरू होणार होता. पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची चौकशीदेखील केली. पेपरफुटीत मुकेश यादवबरोबर आणखी कोणाचा सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याआधीदेखील पेपर फुटलेत का, इत्यादी मुद्यांवर आता पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला रसायनशास्त्राचा पेपर आणखी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला याची माहितीदेखील पोलीस घेत आहेत. दरम्यान, यावर अद्याप राज्य शिक्षण मंडळाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.