युवा परिवर्तन संस्थेतर्फे तृतीयपंथीयांना ज्वेलरी बनवण्याचे प्रशिक्षण
![Training in jewelry making for transgenders by Yuva Parivartan Sanstha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Training-in-jewelry-making-for-transgenders-by-Yuva-Parivartan-Sanstha-780x470.jpg)
मुंबई | तृतीयपंथीयांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी युवा परिवर्तन संस्था आणि रोटरी क्लब ऑफ पवई यांच्यातर्फे कांजूरमार्ग येथे इमिटेशन ज्वेलरी बनवण्याचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गात तृतीयपंथीयांना इमिटेशन ज्वेलरीचे विविध प्रकार शिकवण्यात येत आहे.
देशातील 80% तृतीयपंथीयांसाठी स्किल ट्रेनिंग कोर्सेसचा अभाव आहे. हीच समाजाची गरज ओळखून खास तृतीयपंथीयांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. नुकतेच या बॅचचे उद्घाटन करण्यात आले. सध्या या प्रशिक्षण वर्गात २५ तृतीयपंथी ज्वेलरी बनवण्याचे प्रशिक्षण घेत आहे. गळ्यातील नेकलेस, बांगड्या, ब्रेसलेट, कानातले अशी विविध प्रकारची ज्वेलरी तयार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यातून त्यांना स्वयंरोजगार मिळून ते स्वत:चा बिझनेस सुरू करू शकतील अथवा ज्वेलरी बनवणाऱ्या व्यावसायिकांकडे काम करू शकतील, असा यामागे उद्देश आहे.
या प्रशिक्षण वर्गात सहभागी तृतीयपंथीय बांधवांना राहुल सोनावणे ज्वेलरी बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. राहूल सांगतात की, मी गेल्या 15 वर्षांपासून ज्वेलरी बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. इतर व्यक्तिंपेक्षा तृतीयपंथीयांकडे शिक्षणाच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असतात. गेल्या 5 ते 10 वर्षांत याचे प्रमाण वाढले असले तरीही अधिकाधिक तृतीयपंथीयांनी आपल्या पायावर उभे रहावे हीच इच्छा आहे, असे ते नमूद करतात.
हेही वाचा : आता रुग्णांना मिळणार ‘विशेष’ ओळख, रुग्णालयांना ‘युनिक आयडी’द्वारे मिळवता येणार माहिती
मेघा वर्मा यांना दागिने घालण्याची प्रचंड आवड आहे. आपण जी ज्वेलरी घालतो, तीच जर आपण घरी केली तर चांगली गोष्ट होईल या विचाराने त्यांनी या प्रशिक्षण वर्गाला एडमिशन घेतली आहे.
ज्वेलरीचा बिझनेस सुरू करायचा विचार
मुंबईत राहणाऱ्या योगी या व्यवसायाने फॅशन डिझायनर असून, सेलिब्रिटीजना स्टायलिस्ट म्हणून काम करतात. कांजुरमार्ग येथील सेंटरमध्ये त्या ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण झाल्यावर योगी हिला स्वत:चा इमिटेशन ज्वेलरी बनवण्याचा बिझनेस सुरू करायचा आहे. सध्या माझ्याकडे 10 – 20 तृतीयपंथी लोक काम करतात. हा कोर्स केल्यावर मी त्यांनाही काम देईन आणि प्रदर्शनातही स्टॉल्स लावेन असेही त्या सांगतात.
दोन वर्षात १५० तृतीयपंथी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
गेल्या २ वर्षात आम्ही १५० तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे स्किल कोर्सेस चालवले आहेत. यामध्ये लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट, फूड आणि बेवरेजेस, ज्वेलरी मेकिंग, ब्युटिशियन असे विविध प्रकारचे कोर्सेस त्यांच्यासाठी चालवतो. यापैकी ८० टक्के तृतीयपंथी विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत आहेत, असे कोर्सच्या समन्वयक शिल्पा गायकवाड यांनी सांगितले.