TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

हजारो वाहनधारक वाहन नोंदणी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत

वसई:  वाहने नोंदणी करून झाली असतानाही वसईतला हजारो वाहनधारकांना वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळाले नाही. परिवहन व टपाल विभागाच्या होत असलेली दिरंगाई आज हजारो  वाहनधारकांना वाहन नोंदणी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असून अनेक वाहनधारकांना ते मिळविण्यासाठी परिवहन कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत.

वाहन खरेदी केल्यानंतर वसईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात  मोठय़ा संख्येने वाहने  नोंदणीसाठी येतात. वाहन नोंदणी केल्यानंतर वाहनधारकांना परिवहन विभागाकडून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) दिले जाते. मागील काही वर्षांपासून वाहनधारकांचे नोंदणी प्रमाणपत्र टपालाद्वारे घरी पाठविण्याची प्रक्रिया उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून केली जात आहे. यासाठी वाहनधारकाला एक महिन्याचा कालावधी लागेल असे सांगण्यात येते.  मात्र वसई, विरारमध्ये वाहन नोंदणी करून काही महिने उलटून गेले तरी नोंदणी प्रमाणपत्र वाहनधारकांना मिळालेले नाही. यासाठी अनेक वाहनधारकांना टपाल व परिवहन विभागाच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. वसईतील सुमारे १५ ते २० हजार इतक्या वाहनधारकांना अजूनही नोंदणी प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. 

 मे महिन्यात मी माझ्या वाहनांची नोंदणी केली होती. पाच महिने उलटून गेले तरीही अद्याप मला नोंदणी प्रमाणपत्र मिळाले नाही असे वाहनधारक विशाल राऊत याने सांगितले आहे. सातत्याने चौकशी करून आज येईल उद्या येईल अशी उत्तरे दिली जात आहेत. वाहनधारकांना जेव्हा वाहतूक पोलीस अडवितात तेव्हा नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.  अनेकदा वाहतूक पोलीस व वाहनधारक यांच्यात खटके उडू लागले आहेत. परिवहन विभागाने वाहनधारकांची होणारी ससेहोलपट लक्षात घेता तातडीने प्रलंबित असलेले नोंदणी प्रमाणपत्र व परवाने वितरण करावे अशी मागणी  वाहनधारकांमधून करण्यात येत आहे.

 लिफाफ्यांचा तुटवडा

विरार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना व वाहननोंदणी प्रमाणपत्र लिफाफ्याचा तुटवडा असल्याने वाहनधारकांना परवाने व इतर कागदपत्रे पाठविण्यास विलंब होत असल्याचे डिफेन रोझारीयो या वाहनधारकाला सांगण्यात आले आहे. कार्यालयातून दर महिन्याला जवळपास ३० परवाने व इतर कागदपत्रे असतात. ती कागदपत्रे पाठविण्यात येत असलेले लिफाफे हे अपुऱ्या प्रमाणात असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे याबाबत आम आदमी पार्टीचे जॉय फेरगोस व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्याचे परिवहन आयुक्त यांच्याकडे पुरेशा प्रमाणात लिफाफे पुरविण्यात यावेत अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

परिवहन आणि टपाल विभागाची टोलवाटोलवी

परिवहन विभागात  तक्रारींचे निवारण करण्याऐवजी त्यावर परिवहन व टपाल विभागाची टोलवाटोलवी सुरू झाली आहे. आम्ही सर्व परवाने व नोंदणी प्रमाणपत्र पोस्टात पाठविली आहेत. मध्यंतरी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ती दूर केली आहे अशी माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. तर दुसरीकडे टपालात परिवहन विभागातून जसेजसे परवाने व नोंदणी प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे याचे वितरण सुरूच आहे असे टपाल विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button