राज्य सरकारची पुन्हा डोकेदुखी वाढली; आक्रमक झालेल्या मनसेने केली नवी मागणी
![The state government’s headaches increased again; Aggressive MNS makes new demand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/The-state-governments-headaches-increased-again-Aggressive-MNS-makes-new-demand.jpg)
मुंबई |मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी करत राज्यातील पोलीस प्रशासनाला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या या अल्टिमेटममुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीचं सत्र सुरू असून राज्यात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशातच आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारकडे आणखी एक मागणी केली आहे. मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत, मात्र मशिदीत सीसीटीव्ही का नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत नांदगावकर यांनी लवकरात लवकर मशिदीसह सर्व धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
बाळा नांदगावकर यांनी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत, परंतु मशिदीत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? सर्वधर्मीय प्रार्थनास्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये? हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसंच असं करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी,’ असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मशिदीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करणारं ट्वीट करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही टॅग केलं आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच आता या नव्या मागणीवरूनही आगामी काळात राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मशिदीत सीसीटीव्ही बसवण्याच्या मनसेच्या मागणीला गृहमंत्र्यांकडून कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.