मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक
![The person who threatened to kill Mukesh Ambani was arrested from Bihar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-06-at-5.35.33-PM.jpeg)
मुंबई । रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी काल मिळाली होती. तसंच, कॉलरने अंबानी कुटुंबाला देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती. बुधवारी दुपारी लँडलाईन नंबरवर धमकीचा फोन आला होता. याप्रकरमी पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत एका आरोपीला बिहारच्या दरभंगा येऊन अटक करण्यात आली आहे. राकेश कुमार मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राकेश कुमार मिश्रा याने रिलायन्स रुग्णालयात फोन करून रुग्णालय उडवून देण्याची आणि मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसंच, मुंबईतील अल्टामाऊंट रोडवरील अंबानींचे निवास्थान अँटिलिया उडवून देण्याचीही धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांत तत्काळ तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलिसांनीही वेगाने पावले उचलली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला. लॅण्डलाइनवर फोन आल्याने त्या लॅण्डलाइनचा नंबर ट्रेस करण्यात आला. तो नंबर बिहारमधील दरभंगा येथील असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे एक तपास पथक बिहारच्या दरभंगा येथे पाठवण्यात आले. तेथून आरोपी राकेश कुमार मिश्रा याला अटक करण्यात आली. राकेश कुमार हा बेरोजगार असल्याने त्याने असं कृत्य केल्याचं सांगितलं जातंय.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेक धमकीचे फोन येत आहेत. मुंबईसह विविध ठिकाणं बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. या धमक्या कुख्यात गुंडांच्या नावाने देण्यात येतात तर काही धमक्या निनावी असतात. तपासाअंती या धमकीच्या फोनबाबत काहीच निष्पन्न होत नाहीत. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने मस्करीतून असं कृत्य केल्याचं समोर येतं. त्यामुळे अशा प्ररकणांवर आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.