TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरीच्या जत्रेसाठीही पालिकेची तयारी सुरू

मुंबई : वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरीच्या जत्रेसाठीही पालिकेची तयारी सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेली ही जत्रा ११ ते १८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या जत्रेसाठी चर्चच्या अगदी जवळ असलेल्या २० तात्पुरत्या दुकानांसाठी पालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही लिलाव करण्यात आला. एकूण २० पैकी १० दुकानांसाठी प्रतिसाद मिळाला असून तात्पुरत्या दुकानासाठी १ लाख ११ हजारांची बोली लावण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना व टाळेबंदीमुळे होऊ न शकलेली वांद्रे येथील माऊंट मेरी जत्रा यंदा भरणार आहे.

या जत्रेत मेणबत्ती, फुलांची दुकाने, खाद्यपदार्थ, चणे-फुटाण्याचा प्रसाद अशी चारशेहून अधिक दुकाने असतात. त्यातील काही स्थानिक लोकांसाठी राखीव असतात. चर्चच्या अगदी जवळ असलेल्या दुकानांसाठी लिलाव होतो. याबाबत उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार या वेळीही प्रक्रिया पार पडली. पालिकेने इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. त्यात माऊंट मेरी रोडवरील २० दुकानांपैकी १० दुकानांसाठी अर्ज मिळाले आहेत. या वर्षी पहिल्या दुकानासाठी दहा दिवसांकरिता १ लाख ११ हजारांची बोली लावण्यात आल्याची माहिती साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली. उर्वरित दहा दुकानांसाठी १० सप्टेंबरला पुन्हा लिलाव होणार असून त्या वेळी प्रतिसाद आल्यास त्यांना अनामत रक्कम स्वीकारून तात्पुरती जागा दिली जाणार आहे. अन्यथा या जागा तशाच ठेवल्या जातील असे त्यांनी सांगितले.

चर्चच्या जवळ असलेल्या दुकानांसाठी यंदा किमान ९७ हजार ४३७ रुपये प्रति दुकान अशी किमान किंमत ठरवण्यात आली होती. या दुकानांमध्ये केवळ धार्मिक वस्तू विकल्या जातात. चर्चपासून लांब असलेल्या मार्गावरील दुकानांमध्ये अन्य वस्तू विकता येतात. त्याकरिता २२५० रुपये परवाना शूल्क व तितकीच अनामत रक्कम असते, असेही त्यांनी सांगितले. या दुकानांसाठी येत्या ५ सप्टेंबरला लिलाव होणार आहे.  या सगळय़ा प्रक्रियेतून पालिकेला ३० लाखांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. दोन वर्षांनंतर या वर्षी जत्रा होत असल्यामुळे  दर दिवशी लाख ते दीड लाख नागरिक या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button