TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

रेल्वे स्थानकांमध्ये फेरीवाल्यांचाय वावर कायम

ठाणे रेल्वे स्थानकात काही फेरीवाल्यांनी महिला प्रवाशाला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली असून या घटनेमुळे पुन्हा एकदा फेरीवाल्यांचे वर्चस्व आणि महानगरपालिका, तसेच रेल्वे प्रशासनाच्या कुचकामी यंत्रणेचे वाभाडे निघू लागले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने २०२१ पासून आतापर्यंत मध्य रेल्वे उपनगरीय हद्दीतील सुमारे नऊ हजार ९७१ अनधिकृत फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली असून ५५ जणांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा फेरीवाल्यांची संख्या वाढल्याचे कारवाईवरून निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई करून रेल्वे स्थानके फेरीवालामुक्त करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून होऊ लागली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या हद्दीत अनधिकृत फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे.  काही रेल्वे स्थानकांतील प्रवेशद्वारांजवळच फेरीवाल्यांनी ठाण मंडले आहे. तर काही स्थानकांच्या हद्दीत फेरीवाल्यांचा प्रचंड वावर आहे. याशिवाय पादचारीपूल, लोकल प्रवासातही फेरीवाले दिसू लागले आहेत. यात काही वेळा प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये वादही होऊ लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेने स्थानकालगतच्या १५० मीटर परिसर फेरीवालामुक्त करण्याबाबत धोरण आखून त्याची अंमलबजावणीही केली होती. करोनाकाळात आणि त्यानंतर निर्बंध लागू करण्यात आल्याने परिसर फेरीवाला मुक्त झाला होता. मात्र निर्बंध शिथिल होताच स्थानक परिसरात पुन्हा फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, महानगरपालिकेने रेल्वेच्या हद्दीतील १५० मीटर परिसर फेरीवालामुक्त करण्यासांठी पुन्हा एकदा कंबर कसली. मात्र त्यानंतरही फेरीवाले हटायला तयार नाहीत. परिणामी, महानगरपालिका तसेच रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहे.

ठाणे स्थानकात ५२ वर्षीय महिला प्रवाशाला फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. रेल्वे पुलावर चालताना बाकड्याचा अडथळा होत असल्याने फेरीवाल्याला विचारणा करणाऱ्या एका महिलेला फेरीवाल्यांच्या टोळीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आरोपीना अटक केली. मात्र प्रवाशाने तक्रार केल्यानंतरच होणाऱ्या कारवाईबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

फेरीवाले रेल्वेच्या हद्दीत तसेच लोकलमध्ये बिनदिक्कतपणे व्यवसाय करीत असतात. रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका त्याविरोधात कारवाईचा केवळ दिखावा करीत असतात. एका महिला प्रवाशाला मारहाण झाल्याने या दोन्ही यंत्रणा कशा कुचकामी आहेत हे सिद्ध झाले आहे, असा आरोप उपनगरीय रेल्वे प्रवासी संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने रेल्वे स्थानक फेरीवालामुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी प्रवासी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला.

दरम्यान, रेल्वेच्या हद्दीत अनधिकृत फेरीवाल्यांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषीकुमार शुक्ला यांनी दिली. न्यायालयाकडून दंड आणि कारावासाची शिक्षा फेरीवाल्यांना करण्यात येते. तरीही स्थानके फेरीवालामुक्त व्हावी यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन शुक्ला यांनी दिले. मध्य रेल्वे उपनगरीय हद्दीत जानेवारी ते डिसेंबर २०२१ मध्ये चार हजार ३०२ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून १३ जणांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. त्यांच्याकडून ५२ लाख ८१ हजार २४५ रुपये दंड वसूल करण्यात आला होता. २०२२ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या काळात पाच हजार ६६९ फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ६१ लाख ३६ हजार ४०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. तर ४२ फेरीवाल्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. मात्र रेल्वे स्थानकांमधील फेरीवाल्यांचा त्रास कमी झालेला नाही.

रेल्वे स्थानकाच्या हद्दीत आणि लोकलमधील महिला डब्यातही फेरीवाल्यांचा वावर वाढत आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येते, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मग पुन्हा तेच फेरीवाले कसे येतात, असा प्रश्न असून त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. नियम, कायदे हे सर्वाना समान असावेत.

छाया कदम, (महिला प्रवासीदादर रहिवासी)

रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून अनेकदा प्रवेशद्वाराजवळच ते उभे असतात.त्यामुळे स्थानकात प्रवेश करताना अडथळा होतो. त्यांना बाजुला होण्यास सांगितल्यानंतर ते हुज्जत घालतात.त्यामुळे स्थानके फेरीवालामुक्त झालेच पाहिजे. समृद्धी सकपाळ (ठाणे, महिला प्रवासी,)

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button