ताज्या घडामोडीमुंबई

केशकर्तनाचा व्यवसाय अजूनही अस्थिरच

मुंबई | निर्बंध शिथिल होताना केशकर्तनालये सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी या व्यवसायाला अद्याप स्थैर्य प्राप्त झालेले नाही. केशकर्तनालयात लोक शनिवार-रविवार या सुट्टय़ांच्या दिवशी अधिक प्रमाणात जात असतात आणि नेमके त्याच दिवशी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्देश असल्याने परवानगी मिळूनही या व्यावसायिकांचा अर्थार्जनाचा प्रश्न सुटलेला नाही.

आमच्या व्यवसायात ग्राहकांशी आमचा थेट संपर्क असल्याने गेल्या वर्षी आम्हाला शिथिलीकरणानंतरही लवकर परवानगी मिळाली नाही. पुढे परवानगी मिळाल्यानंतरही वेळमर्यादा होती. आजही सायंकाळी चापर्यंतच परवानगी असल्याने या वेळा ग्राहकांच्या वेळेशी जुळणाऱ्या नसल्याने ग्राहक फिरकत नाहीत, अशी खंत केशकर्तनालयाच्या मालकांनी व्यक्त केली.

‘सध्या नागरिकांचे काम घरी बसून सुरू असले तरी सकाळच्या वेळेत प्रत्येकालाच कामाची घाई असते. संध्याकाळी निवांत झाल्यावर लोक केस कापण्यास, सौंदर्य उपचारांना वेळ देतात. याच वेळेत दुकानाचे दार बंद असल्याने ग्राहक येत नाहीत. विशेष म्हणजे र्निबधांमुळे आठवडय़ातले दोन्ही सुट्टीचे आणि कमाईचे दिवस आमच्या हातून निसटले. त्यामुळे व्यवसाय कसा करावा,’ अशी चिंता वरळी येथील ‘गुड लुक’ सलूनचे नितीन चव्हाण यांनी व्यक्त केली. काही व्यावसायिकांकडे वर्षांनुवर्षे काम करणारे परप्रांतीय कामगार आहेत. सध्या व्यवसाय होत नसल्याने त्यांचे पोट कसे भरायचे, असा प्रश्न अनेकांपुढे आहे.

गेल्या दीड वर्षांत या व्यवसायाची वाताहत झाली आहे. तरीही आमच्या प्रश्नांकडे कुणाचेही लक्ष नाही. या सेवेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे असे पत्रही पुराव्यांसहित काही महिन्यांपूर्वी सरकारला दिले आहे. दुकानाचे भाडे, कामगारांचे वेतन भागवताना मालकांच्या नाकीनऊ येत आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका समोर दिसत असताना निर्बंध कठोर झाले तर उपाशी राहण्याची वेळ येईल. त्यामुळे राज्य सरकारने आम्हालाही आर्थिक मदतीचा हात द्यावा.

– प्रकाश चव्हाण, अध्यक्ष, स्वतंत्र सलून, ब्युटी पार्लर कामगार युनियन

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button