शिक्षकांचीच परीक्षा होणार, शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं विभागीय आयुक्तांचा निर्णय
![The examination of the teachers will be held, the decision of the divisional commissioner is due to the decline in the quality of education](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/fa7fddb515b733119a9ae8300582598f167056384185989_original-720x470.webp)
मुंबई | आत्तापर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना देखील परीक्षा द्यावी लागणार आहे. कारण मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रेकर म्हणाले आहेत. प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करण्यात आला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रकर म्हणाले आहे. त्यामुळे यापुढे आता शिक्षकांना देखील परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
याबाबत बोलतांना केंद्रकर म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर तपासाला असता, त्यात प्रमाण खूपच खालवला गेल्याचे समोर आले. त्यात शाळा बंद होत्या आणि ऑनलाइन शिक्षणाचा विशेष काही परिणाम झाला नाही असे आमचं मत आहे. शाळेत जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी अनेक ठिकाणी शिक्षकांना त्यांच्याच विषयात पारंगतच नसल्याचे समोर आले. फार कमी शिक्षक होते की, ते त्यांच्या विषयात पारंगत होते. त्यामुळे शिक्षकांची देखील परीक्षा घेतली पाहिजे असा निर्णय घेतला असल्याचं केंद्रकर म्हणाले.
आठही जिल्ह्यात सर्वेक्षण…
लातूर जिल्ह्यात जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी आठवीच्या 45 टक्के मुलांना भागाकार देखील करता येत नव्हता. लातूर जिल्ह्याचे सीईओ अभिनव गोयल खूप चांगले काम करतात. मात्र त्यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर इतर जिल्ह्यात देखील असणारच आहे. तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले, सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचे जाणवले असल्याचं केंद्रकर म्हणाले.