TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

देशातील पहिले कांदळवन उद्यान गोराईत

मुंबई : सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणारे भारतातील पहिले कांदळवन उद्यान बोरिवलीमधील गोराई खाडीलगत आकाराला येणार असून मार्च २०२३ पर्यंत या उद्यानाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. कांदळवन उन्नत मार्ग (बोर्ड वॉक) हे या उद्यानातील प्रमुख आकर्षण असणार आहे.

मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनारा आणि कांदळवनामुळे जैवविविधता तग धरून आहे. या निसर्गसंपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी; तसेच त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कांदळवन कक्षाने ‘पर्यावरण पर्यटन प्रकल्प’ हाती घेतला आहे. त्याचबरोबर कांदळवन संवर्धन केंद्र आणि कांदळवन उद्यान उभे करण्यात येत आहे. गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्च करून, तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्च करून कांदळवन उद्यान विकसित केले जाणार आहे.

गोराई कांदळवन उद्यान हे गोराई जेट्टीजवळ असून तेथे समृद्ध कांदळवने दिसतात. तेथे निसर्ग पर्यटन केंद्र आणि कांदळवन उन्नत मार्ग हे मुख्य आकर्षण आहे. सध्या निसर्ग पर्यटन केंद्राचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. एकही झाड न तोडता, निसर्गाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने कांदळवन उद्यानाची निर्मिती होणार आहे. हे उद्यान सर्वसामान्यांना आकर्षित आणि शिक्षित करेल, अशी रचना तयार करण्यात आली आहे. उद्यानाला भेट देणाऱ्यांना मुंबईतील कांदळवन परिसंस्थेचे महत्त्व, कांदळवनाचे मानवाला असणारे फायदे समजणार आहेत. यासह कांदळवनाच्या संवर्धनाची आवश्यकता आणि संवर्धनासाठी उपाय कोणते याची माहिती मिळणार आहे. कांदळवन उद्यानाची माहिती देणारे एक अ‍ॅप तयार करण्यात येत आहे.

सिंगापूर, अबूधाबी, थायलंड या देशात असलेल्या कांदळवनातील उन्नत मार्गासारखा उन्नत मार्ग गोराईत तयार करण्यात येणार आहे. हा मार्ग लाकडी असून त्याची लांबी ७०० मीटर आणि रुंदी २.४ मीटर असेल. तसेच या मार्गाच्या जागोजागी विश्रांतीस्थळ आणि माहितीस्थळ उभारण्यात येणार आहेत. या उन्नत मार्गाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा उन्नत मार्ग तयार करताना कोणत्याही वनस्पतीची हानी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

सौरऊर्जा निर्मिती

दाट कांदळवनात आणि क्षेपणभूमीच्या परिसरात साकारण्यात येणाऱ्या या केंद्रात कांदळवन परिसंस्थेतील वनस्पती आणि प्राण्यांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. हरित ऊर्जेचा वापर आणि ऊर्जेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने १२० किलोवॅट प्रतितास क्षमतेच्या ‘बिल्डिंग इंटिग्रेटेड फोटो व्होल्टिक’  (बीआयपीव्ही) प्रणालीच्या माध्यमातून सौरऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानाची एकूण ८० टक्के ऊर्जेची गरज पूर्ण होईल, असा विश्वास या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button