ठाकरे बंधूंचा मोर्चा, मनोमीलनाची चर्चा!
हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि उबाठा गट आक्रमक ; दि. ५ जुलै रोजी येणार एकत्र ?
मुंबई : हिंदीच्या संभाव्य सक्तीविरोधात वातावरण चांगलेच तापले असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, आम्ही ती उधळून लावू, असे इशारे दोघांनीही दिले आहेत. हिंदीला विरोध करण्यासाठी दि. ५ जुलै रोजी ‘मनसे’ चा भव्य मोर्चा निघणार असून त्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही सहभागी होण्याची शक्यता आहे. या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
नो झेंडा, ओन्ली अजेंडा !
मनसेने आयोजित केलेल्या या मोर्चामध्ये मराठी प्रेमी तसेच समविचारी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. हिंदीविरोधी अजेंडा असून कोणीही आपल्या पक्षाचा झेंडा आणू नये, असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांचा इशारा..
राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ सोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील हिंदीला विरोध करण्यात येत आहे, त्यामुळे या सर्वपक्षीय मोर्चात कोण कोण सहभागी होणार आणि कोण होणार नाही तेही मला बघायचे आहे, असा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
हेही वाचा – “हे सरकार कॉन्ट्रॅक्टर धार्जिण”; शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
हिंदू आहोत, पण हिंदी सक्ती नको..
ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषदा घेत हिंदीसंदर्भातील पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवू देणार नसल्याचा इशारा ठाकरे बंधूंनी दिला आहे. तर मतांसाठी ठाकरे बंधूंकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट केला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून विशेषतः भाजपाकडून करण्यात आला आहे.
पहिलीपासून हिंदी : नाहीच नाही !
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याला कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी नकोच म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. तर राज ठाकरे देखील दि. ५ जुलैला हिंदीविरोधात मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा सर्वपक्षीय असून मराठी माणूस या मोर्चाचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी सरकारला आव्हान दिले आहे.
राज, उद्धव यांच्याशी बोलणार?
दरम्यान, या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत देखील बोलणार आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी छोटी-मोठी भांडणे दूर ठेवण्यासाठी तयार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. या संदर्भातील चित्र तुम्हाला मोर्चात पाहायला मिळणार असल्याचे सूचक वक्तव्य देखील राज ठाकरे यांनी केले आहे. दुसरीकडे, हिंदीविरोधातील लढ्यात उतरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देखील मराठी माणसांना आवाहन केले आहे.
बावनकुळे यांची टीका..
पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात येणार नाही, हे सरकारने वेळोवेळी घोषित केले आहे. पण खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी मराठी भाषेला विरोध असे भासवले जात आहे. हिंदी भाषा ही ऐच्छिक भाषा आहे, हे वेळोवेळी सांगून देखील केवळ राजकारणासाठी पत्रकार परिषदा आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
हिंदीसक्ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाची!
हिंदी सक्तीवरुन ‘खोटे कथानक’ तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना प्रथम स्वीकारले. डॉ.रघुनाथ माशेलकर समितीने तयार केलेला ‘इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी व हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत’ हा अहवाल ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने स्वीकारला होता, अशी आठवण मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी करुन दिली आहे.
मोर्चात सहभागी होण्याचे कलाकार आणि साहित्यिकांना आवाहन..
हिंदी सक्तीविरोधात दि. ५ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य मोर्चा निघणार असून प्रत्येक मराठी प्रेमीने मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे, सर्व मराठी कलाकार आणि साहित्यिक यांनाही आपण आवाहन करत असून सर्वांना तसे पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या मोर्चाला कोण कोण उपस्थित राहणार आणि कोण अनुपस्थित राहणार, यावर आपले बारीक लक्ष असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.




