दहशतवादी हाफीज सईदच्या घराबाहेरील गाडीत स्फोट, ३ ठार
![Terrorist car bomb kills 3 outside Hafiz Saeed's house](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/di-3-4.jpg)
मुंबई |
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-ऊद-दावाचा (जेयूडी) म्होरक्या हाफीज सईद याच्या घराबाहेर बुधवारी एका गाडीत ठेवण्यात आलेल्या शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला. त्यामध्ये किमान तीन जण ठार झाले असून २२ हून अधिक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जौहर शहरातील बीओआर सोसायटी येथील सईदच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा असून तेथेच हा स्फोट झाला. सईदच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा नसता तर अधिक मोठ्या प्रमाणावर हानी झाली असती, असे पोलीस महानिरीक्षक (पंजाब) इनाम घनी यांनी सांगितले. या गाडीत स्फोटके ठेवण्यात आली होती, सईदच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा होता, ही गाडी पोलिसांना टाळून पुढे जाऊ शकली नाही, असे सांगून हे दहशतवादी कृत्य असल्याचे घनी यांनी स्पष्ट केले. या घटनेचे वृत्त कळताच दहशतवाद प्रतिबंधक विभागाने स्फोटाच्या ठिकाणी येऊन सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
या स्फोटात जखमी झालेल्यांना जिना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असे रुग्णालयातील डॉ. याह््या सुलतान यांनी सांगितले. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे. पाकिस्तानचे अंतर्गतमंत्री शेख रशीद यांनी पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलीस महानिरीक्षकांना या बाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या स्फोटाच्या स्वरूपाची तपासणी केली जात आहे. मध्यवर्ती यंत्रणा पंजाब सरकारला तपासामध्ये मदत करीत आहेत. हा अत्यंत शक्तिशाली स्फोट होता, स्फोटामुळे या परिसरातील दुकानांचे, घरांचे आणि वाहनांचे नुकसान झाले, स्फोटाच्या हादऱ्यामुळे एका घराचे छतही कोसळले. स्फोट तेव्हा हाफीज सईद घरातच होता अशा अफवाही पसरल्या होत्या. दहशतवादाला आर्थिक साहाय्य केल्याबद्दल सईदला दोषी ठरविण्यात आले असून सध्या तो लाहोरमधील कोट लखपत कारागृहात आहे.