दहावी, बारावीच्या परिक्षा ठरलेल्या वेळीच होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती
![Tenth - Twelfth will get concessional marks: Education Minister Varsha Gaikwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/23bmVarshaGaikwad.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भावात घट झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या राज्यातील शाळा सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. काही भागांतील शाळा सुरु आहेत, तर काही भागांतील शाळा अद्याप बंदच आहेत. अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार की, परीक्षा पुढे ढकलण्यात येणार? यासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या परिक्षा ठरलेल्या वेळीच होणार असल्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थी व पालकांनी संभ्रमात राहू नये असे सांगितले.
यावेळी बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आम्ही पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. 15 फेब्रुवारीपर्यंत परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, पुरवणी परीक्षा असते. कोविड परिस्थितीमुळे जे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकले नाहीत त्यांना पुरवणी परीक्षेत बसवावे लागते. अशा एकावर एक अवलंबून गोष्टी असतात. त्यानंतर अकरावीचे प्रवेश असतात. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तो विचारपूर्व घेतला पाहिजे.
आम्ही शैक्षणिक बोर्डासोबत चर्चा करत आहोत, अभ्यासक्रमाच्या संदर्भातही चर्चा करत आहोत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या नियमित वेळेनुसार आणि ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. परिक्षा रद्द केल्या तर निकाल आणि अॅडमिशनवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी संभ्रमात राहू नये, असेही यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितले.