TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

नायर इस्पितळातील औषध दुकानात परवाना नसलेल्या औषधांचा पुरवठा !

मुंबई महापालिकेच्या नायर इस्पितळातील सहकारी तत्त्वावरील औषध दुकानात उत्पादन परवाना नसलेल्या औषधांचा पुरवठा गेल्याची गंभीर बाब पुढे आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या औषध दुकानाचा परवाना रद्द केला आहे.नायर इस्पितळात दि नॅशनल कन्झ्युमर्स को-ॲाप सोसायटी लि. या नावे औषधाचे दुकान आहे. या दुकानातून परवाना नसलेल्या उत्पादक कंपन्यांची औषधे विकल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे दाखल झाली होती. त्यानंतर औषध निरीक्षक रा. बा. बनकर तसेच गुप्तवार्ता विभागाने निरीक्षक आर. व्ही. रवी यांनी सुंदर औषध दुकानाची तपासणी करून अहवाल सादर केला. या अहवालात परवाना नसलेल्या कंपनीच्या औषधांचा पुरवठा झाल्याची गंभीर बाब नजरेस आली. त्यानंतर नॅशनल कन्झ्युमर्स सोसायटीवर `कारणे दाखवाʼ नोटिस बजावण्यात आली. या नोटिशीला सोसायटीने उत्तर दिले. मात्र ते समाधानकारक न वाटल्याने संबंधित कंपनीचा व या सोसायटीच्या नावे असलेला दुकानाचा औषध परवाना रद्द करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त गौरीशंकर बायले यांनी सांगितले.

या अहवालानुसार, फ्युझन हेल्थकेअर प्रा. लि.च्या वैद्यकीय प्रतिनिधीकडे संबंधित दुकानाने औषधांची तोंडी मागणी नोंदविली होती. मात्र घाटकोपर येथील ज्या मे. कुबेकॅान सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्याकडे पुरवठा झाला त्या कंपनीकडे संबंधित सोसायटीने लेखी मागणीपत्र नोंदविले नव्हते. तरीही संबंधित कंपनीकडून परवाना मंजूर नसतानाही औषधांचा पुरवठा केला व त्या औषधांची खरेदी तसेच विक्री संबंधित औषध दुकानाने केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत तक्रार आली म्हणून हा प्रकार उघड झाला. मात्र हे धोकादायक असल्यामुळेच परवाना रद्द करण्यात आल्याचे बायले यांनी सांगितले. याविरोधात अपील करण्यासाठी संबंधित सोसायटीकडे ९० दिवस आहेत. अपील फेटाळले गेले तर या सोसायटीचा परवाना कायमस्वरूटी रद्द होईल, असे बायले यांनी सांगितले.

दि नॅशनल कन्झ्युमर को-ॲाप सोसायटीचे अध्यक्ष डॅा. देवीदास शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले, की अन्न व औषध प्रशासनाचा काहीतरी गैरसमज झाला असून दिलेल्या मुदतीत संबंधित यंत्रणांकडे अपील करून तो दूर केला जाईल. याबाबत आमच्या कार्यकारी मंडळापुढे हा विषय ठेवून चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button