‘…तर आपण या संकटावर सहज मात करू’; राज ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
![‘So we will overcome this crisis easily’; Raj Thackeray thanked Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Narendra-Modi-and-Raj-Thackeray.jpg)
मुंबई – केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही परवानगी दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
राज ठाकरेंनी या संदर्भात ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण या संकटावर सहज मात करू हे नक्की, असं राज ठाकरे म्हणाले.
राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं होत. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या होत्या. यामध्ये लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती.