म्हाडाचा पेपर फोडल्याप्रकरणी सहाजण अटकेत, विविध क्लासेसचे संचालक आरोपी
![Six arrested for breaking MHADA papers, accused of directing various classes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/mhada-4.jpg)
मुंबई – महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून आज विविध पदांच्या भरतीसाठी आज (रविवार) परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आली. या परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्याचे या विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिराने सांगितले. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने सहा आरोपींना पकडले असून त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
रविवारी नियोजित परीक्षा शनिवारी रात्री उशिरा रद्द करण्यात आली. त्यामुळे, म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे या भागात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या आरोपींकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य आढळून आले आहेत.
तसेच, काहींचे मोबाइल नंबर देखील मिळाले आहेत. या कारवाईमधून आणखी नावे समोर येण्याची शक्यता असल्याने आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचेही त्यांनी सांगितले.