शोभा यात्रांनी मुंबई नगरी दणाणून निघाली; मराठी नववर्षाचे दणक्यात स्वागत
![Shobha Yatras marched through Mumbai city; Welcome to Marathi New Year](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Shobha-Yatras-marched-through-Mumbai-city-Welcome-to-Marathi-New-Year.jpg)
मुंबई | राज्य सरकारने करोनाचे निर्बंध पूर्णपणे रद्द केल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी आज मुंबई नगरी शोभा यात्रा आणि स्वागत यात्रांनी दणाणून निघाली आहे. आज शनिवार सकाळपासून दादर, गिरगाव, बोरिवली, मुलुंड, ठाणे, डोंबिवली याठिकाणी ढोल-ताशे, लेझीम पथकासह नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यांवर काढलेल्या भव्य रांगोळ्या लक्ष वेधून घेत आहेत.
गिरगावात आज सकाळपासून नव वर्ष स्वागत यात्रा सुरु झाली आहे. ढोल -ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. या स्वागत यात्रेत १५ चित्ररथ सहभागी झाले आहेत. ज्यात गणेश उत्सव, डबेवाल्यांचा चित्ररथ, महिला आणि लहान मुलांचे लेझीम पथक, ढोल पथक सहभागी झाले आहेत. स्वागत यात्रेबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
ठाण्यात स्वागत यात्रेत मल्लखांबपट्टू सहभागी झाले असून यात मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे. त्याशिवाय तलवारबाजी, दांडपट्टा यासारख्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक शोभा यात्रेत सादर करण्यात आले. मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ यंदाच्या स्वागत यात्रांचे वैशिष्ट्य आहे. आज दादरमध्ये पहिल्यांदाच नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. ढोल ताश्यांचा गरज सुरु आहे.
मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज मुंबईतील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबा देवी, श्री सिद्धिविनायक, महालक्ष्मी मंदिरात आज सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. राज्य सरकारने देवस्थांनामधील दर्शनासाठीचे ई पास बंद केले आहेत. त्यामुळे आजपासून मंदिरांमध्ये भाविकांना थेट दर्शन मिळणार आहे.