शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नये: प्रकाश आंबेडकर
![अॅड. प्रकाश आंबेडकरांची फडणवीसांवर शेलक्या भाषेत टीका ; ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/05_04_2019-prakash_ambedkar-fir_19104716-1.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं, अशी मागणी भाजपने केली होती. लतादीदींच्या स्मारकाबाबत आपले मत व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी ‘शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नये’, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. शिवाजी पार्कवर खेळच खेळले जावेत. स्मारकासाठी इतरही अनेक जागा आहेत, तिथं स्मारक बांधले जावं असं ते म्हणाले.
लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं, अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. स्मारकाबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, “याला माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला पाहिजे, त्याची स्मशानभूमी होऊ नये. शेजारी दुसरी चांगली मोठी स्मशानभूमी आहे. परंतु शिवाजी पार्क हे एकमेव मोठं ग्राऊंड आहे. ज्यावर मुलांना खेळता येतं. तिथं शाळा, कॉलेज किंवा इतर मुलांच्या मॅचेस होतात. व्यक्तींचं स्मारक करायचे असेल तर इतर अनेक जागा आहेत, परंतु मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानांवर अतिक्रमण करावं असे मला वाटत नाही.”
भारतरत्न लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय क्षेत्रातील दिग्गाजांपासून तर शाहरुख खान, श्रद्धा कपूर, रणबीर कपूर, जावेद अख्तर या बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. पण, प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कलाकार अमिताभ बच्चन यावेळी दिसले नाही. त्याचं कारण आता समोर आलं आहे.