राज्यात अनेक ठिकाणी शाळेची घंटा वाजली
![Schools in Pune, Pimpri Chinchwad starting from today, school bells will ring after one and a half years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/school-759-1-2.jpg)
मुंबई – तब्बल पावणे २ वर्षांनंतर राज्यातील बहुतांश भागातील शाळा अखेर आज उघडल्या. राज्याच्या ग्रामीण भागात शाळांमध्ये विद्यार्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सकाळी पालक आपल्या पाल्यांना घेऊन शाळेत आले होते. काही ठिकाणी ढोल ताश्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, तर काही ठिकाणी फुगे, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, शाळांमध्ये विद्यार्थांना कोरोना नियमांचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या नियमांचे पालन विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना करावे लागणार आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा आज श्रीगणेशा झाला. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांची लगबग दिसून आली, तर शाळा प्रशासनाकडूनही विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येत होती. जिल्ह्यातील १,८५५ शाळांचे १ लाख ८८ हजारांहून जास्त विद्यार्थी आजपासून ऑफलाईन शिक्षणाला सुरुवात करत आहेत, तर चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून कोविडबाबत खबरदारी घेत पहिली ते चौथी वर्गाच्या २ हजार ४१७ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही आजपासून पहिली ते चौथीच्या वर्गात विद्यार्थ्यांच्या किलबिलाट होणार आहे. जिल्ह्यातील २ हजार ५२२ शाळांमध्ये आज घंटा वाजणार आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात आजपासून प्राथमिक शाळा सुरू होत असून आज पहाटेपासूनच शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे दिसून आले. धुळे जिल्ह्यातदेखील शाळा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला, शहरी भागात १७७, ग्रामीण भागात १ हजार ३७० शाळा सुरू झाल्या. सुरुवातीचे काही दिवस फक्त तीनच तास शाळा सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असून शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले, तसेच विद्यार्थी आणि पालकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्याने सावध पवित्रा घेताला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड, नांदेड या महापालिका क्षेत्रांमधील शाळांची घंटा उशिराच वाजणार आहे. तर औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक महापालिकांनी शाळा सुरू करण्याबाबत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.