RSS चा गणवेश परिधान करणाऱ्या ‘या’ माणसाने मदरशामधून सहा मुलांना घेतले दत्तक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Haji-Haider-Azam.jpg)
अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणाऱ्या हाजी हैदर आझम यांनी मालाड येथील मदरशांमधून सहा मुले दत्तक घेतली आहेत. हाजी हैदर आझम भाजपाचे मुंबई शहर उपाध्यक्ष आहेत. चारवेळा हज यात्रा करुन आलेले हाजी हैदर संघाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते. संघाचा संपूर्ण गणवेश परिधान करुन ते या कार्यक्रमाला गेले होत.
हाजी हैदर यांनी दत्तक घेतलेली सहा मुले यावर्षीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहेत. मागच्या आठवडयात मालाड येथील नूर मेहर चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमात हाजी हैदर आझम यांनी मदरशामधील सहा मुलांना दत्तक घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे प्रचंड कौतुक होत आहे. मी ज्या मुलांना दत्तक घेत आहे ती मुले दहावी उत्तीर्ण असून त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलणार आहे असे हैदर यांनी सांगितले.
सय्यद अली यांच्याकडून हा मदरसा चालवला जातो. ही आमची सहावी बॅच असून मदरशामध्ये शिक्षण घेताना आतापर्यंत ४२ मुले एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाली आहेत असे सय्यद अली यांनी सांगितले. यापूर्वी आमदार अस्लम शेख यांनी पहिल्या बॅचमधल्या एका मुलाला दत्तक घेतले होते. पण एकाचवेळी सहा मुलांना दत्तक घेण्याची पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आझम यांनी सांगितले. आरएसएसच्या पोषाखामधील व्हायरल झालेल्या फोटोविषयी त्यांनी सांगितले कि, संघाच्या एका पदाधिकाऱ्याने मला दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले व पोषाखही दिला. मी फक्त कार्यक्रमासाठी गेलो होतो. पोषाख परिधान केला असला तरी आरएसएसमध्ये प्रवेश केलेला नाही असे हाजी हैदर यांनी सांगितले.