राणा दाम्पत्याच्या वक्तव्याने तपास, खटल्यावर परिणाम नाही; जामीन रद्द करण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाची टिप्पणी
![Rana couple's statement does not affect investigation, case; Comment of the Court while rejecting the application for cancellation of bail](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/rana-coupl.jpg)
मुंबई : जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणे हे जामीन रद्द करण्यासाठी पुरेसे कारण असू शकत नाही. जामिनावर बाहेर असताना आरोपींनी तपासात अडथळा आणला आणि त्याचा तपासावर किंवा खटल्यावर परिणाम होत असेल तर जामीन रद्द केला जाऊ शकतो, असे विशेष न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी यांचा जामीन रद्द करण्यास नकार देताना स्पष्ट केले. राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्यासाठी ठोस कारणे आवश्यक आहेत, असेही विशेष न्यायायाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी फेटाळताना नमूद केले.
हनुमान चालिसा पठणप्रकरणी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना त्यांना प्रकरणाबाबत प्रसिद्धीमाध्यमांत वक्तव्य करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतरही राणा दाम्पत्याने प्रसिद्धीमाध्यमांत वक्तव्य करून काही साक्षीदारांना धमकावले, असा आरोप करून पोलिसांनी राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचीही मागणी केली होती, तर राणा यांनी जामिनाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा राणा यांच्या वकिलांनी केला होता.