राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची ‘हाय व्होल्टेज’ बैठक; घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ
![Raj Thackeray convenes 'high voltage' meeting of office bearers; Increased police coverage outside the home](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Raj-Thackeray-convenes-high-voltage-meeting-of-office-bearers-Increased-police-coverage-outside-the-home.jpg)
मुंबई |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज भोंग्याच्या मुद्द्यावर पक्षाची आगामी काळातील भूमिका जाहीर करणार आहेत. या पार्श्वभूमीर राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. निवडक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज ठाकरे भोंग्यांबाबतचे पक्षाचे धोरण जाहीर करणार आहेत.
औरंगाबाद येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी पोलिसांना दिलेल्या ४ मे रोजीच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला. त्यानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मशिदीवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे न हटवल्यास ४ मे पासून कार्यकर्त्यांनी मशिदीसमोरच दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गृहखात्यातही या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नेमका काय निर्णय जाहीर करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ
राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापल्यानंतर या मुद्द्याच्या केंद्रस्थानी असलेल्या राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. ‘शिवतीर्थ’बाहेर नेहमीच्या तुलनेत पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
४ तारखेपासून आम्ही ऐकणार नाही, दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार | राज ठाकरे
गृहमंत्र्यांनीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार
राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटममुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. अशी स्थिती निर्माण होऊन वातावरण बिघडू नये, यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रणनीती ठरवणार आहेत.