क्वारंटाईन कालावाधी सगळीकडे सातच दिवसांचा राहिल: राजेश टोपे
![“राज्यातील करोनाची तिसरी लाट आटोक्यात, पण मास्कमुक्ती…;” आरोग्यमंत्री राजेश टोपे](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Rajesh-Tope-4.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांच्याबरोबर आता साडेतीन ते साडेपाच वाजेपर्यंत जवळजवळ दोन तास पाच राज्यांचा आढावा घेणारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर राज्याची परिस्थिती काय आहे, याची त्यांनी माहिती दिली आहे. शाळा बंद करण्याच्या निर्णय असो वा हे लादलेले निर्णय असोत, हे विचारपूर्वकच घेतले आहेत, लादलेले निर्बंध चांगल्या स्पिरीटने घ्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी क्वारंटाईन कालावाधीबाबत देखील स्पष्टीकरण दिलंय.
राज्यात क्वारंटाईन कालावधीबाबत संभ्रम होता. नेमका किती दिवस हा कालावधी असणार यामधील संभ्रम आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दूर केला आहे. त्यांनी म्हटलंय की, संपूर्ण राज्यातील क्वारंटाईनचा कालावधी हा सारखाच असणार आहे. तो सगळीकडेच सात दिवसांचा राहिल. यामध्ये कुठेही कुणालाही सूट नसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
राज्यात किती गंभीर रुग्ण?
राजेश टोपे यांनी राज्याच्या कोरोना परिस्थितीची माहिती देताना म्हटलंय की, सध्या महाराष्ट्रातील ऍक्टीव्ह केसेस आजच्या एक लाख 73 हजार आहेत. यामधील आयसीयूमध्ये 1711 रुग्ण आहेत. हे एकूण पॉजिटीव्ह रुग्णसंख्येच्या एक टक्काच आहेत. थोडक्यात, आयसीयू बेडवरचे एक आणि ऑक्सिजन बेडवरचे 2 टक्के असे तीन टक्के रुग्णच गंभीर अवस्थेत आहेत. राज्यातील 13 टक्के रुग्ण माईल्ड स्थितीमधले आहेत. राज्यात कुठेही मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची परिस्थिती नाही. हे सांगण्यामागचं कारण असं की, राज्यात 38850 आयसीयू बेड्स आहेत. यापैकी 1710 सध्या ऍडमिट आहेत. त्यामुळे बेड्सची एकूण उपलब्धता आणि त्यातुलनेत सध्याचे रुग्ण कमी आहेत. व्हेंटीलेटरच्या 16 हजारच्या बेड्सपैकी 3 ते 4 टक्केच रुग्ण सध्या आहेत. राज्यातील 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीयेत. राज्यातील 89 टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे तर 60 टक्के लोकांचा दूसरा डोसही पूर्ण झाला आहे. लसीकरण जास्त झालेल्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलायझेशन अत्यंत कमी आहे, त्यामुळे लसीकरणावरच अधिक भर देण्यात येणार आहे.