सरकारच्या जुलमी कारवाईचा निषेध : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
![Protest against government's tyrannical action: Leader of Opposition Praveen Darekar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/dd13514f-c4ef-467f-a80b-87eb75bc03ac.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
सरकारची कारवाई ही जुलमी पद्धतीने केलेली आहे. सामान्य जनतेवर अशा पद्धतीने केलेल्या मनमानीपणाच्या कारवाईचा आम्ही निषेध करीत आहोत. येथील रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून त्यांना पर्यायी घरे सरकारने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.
मालाड पूर्व येथील दफ्तरी रोड कुरार हायवे, हवा हिरा महल येथील मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळीच कारवाई करण्यात आली. विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी तातडीने घटनस्थळी भेट दिली. ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आलेल्या मनमानी प्रकारच्या कारवाईला विरोध करणारे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांना आमदार भातखळकर यांना आरे पोलीस ठाण्यात नेले. दरेकर यांनी आरे पोलीस ठाण्यात जाऊन आमदार भातखळकर यांची भेट घेतली. यासंदर्भात बोलताना दरेकर यांनी सांगितले की, जे प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत मूर्त स्वरूप घेतलेले होते व अंतिम टप्प्यात आले त्यांचे लवकरात लवकर आपल्या हातून उदघाटन व्हावे असे महाविकास आघाडी सरकारला वाटते आणि त्या प्रकल्पांचे उदघाटन करण्यासाठी साम, दाम, दंड वापरून अशा प्रकारची कारवाई होत असून ते अत्यंत चुकीचे असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
दरेकर यांनी सांगितले की, मेट्रोच्या विकासासाठी किंवा कोणत्याही प्रकल्पाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असतो. परंतु पावसाळा असल्यामुळे मानवतावादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कारण पाडकाम केले तर राहिवाशांना पर्यायी व्यवस्था करून द्यायला पाहिजे. परंतु या ठिकाणी जुलमी पद्धतीने कारवाई केली गेली आणि अशी पाडकाम कारवाई करणे योग्य नाही, असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, लोकशाहीमध्ये जनतेला न्याय मागण्याचा अधिकार आहे. रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे हे महत्वाचे होते. परंतु समन्वयाचा अभाव असल्यामुळे लोकांना भर पावसात बेघर व्हावे लागले. प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.