ताज्या घडामोडीमुंबई

यंत्रचालकाच्या निलंबनामुळे अग्निशमन जवानांमध्ये नाराजी

मुंबई | कवायतीदरम्यान (मॉक ड्रील) माटुंगा पूर्व येथील एका बहुमजली इमारतीच्या १६ व्या मजल्यावरील दुर्घटनाग्रस्त भागापर्यंत पंपाच्या साह्याने पाणीपुरवठा करण्यात अग्निशमन दलाचे जवान मग्न असतानाच अचानक मोटर पंप वाहन पुढील वाहनावर आदळून अपघात झाला. या अपघातात तीन जवान जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी यंत्रचालकाला निलंबित केल्यामुळे जवानांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यावर लागलेली आग विझविण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. या दुर्घटनांची गंभीर दखल घेत अग्निशमन दलाने बहुमजली इमारतींमध्ये अग्निशमनाबाबत कवायती (मॉक ड्रील) सुरू केल्या आहेत. अग्निशमन दलाने माटुंगा पूर्व येथील भाऊ दाजी रोडवरील श्री सिद्धी अपार्टमेन्टमध्ये २९ जानेवारी २०२२ रोजी अग्निशमनाच्या कवायतीचे आयोजन केले होते. कवायतीमध्ये धारावी, रावळी कॅम्प, वडाळा अग्निशमन केंद्रांमधील विविध प्रकारची मोटर पंप, जेट्टी-२२ इत्यादी अग्निशमन वाहने सहभागी झाली होती. या वाहनांवरील अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

श्री सिद्धी अपार्टमेंटच्या १६ मजल्यावर अग्निशमनाबाबतची कवायत सुरू होती. या वेळी झालेल्या दुर्घटनेत तीन यंत्रचालक जखमी झाले. कवायतस्थळी रुग्णवाहिका नसल्याने जखमींना टॅक्सीने शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर या दुर्घटनेप्रकरणी संबंधित पंप वाहनावरील यंत्रचालकास निलंबित करण्यात आले. या प्रकरणामुळे अग्निशमन दलामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दुर्घटनाग्रस्त मोटर पंप वाहनातील त्रुटी दडविण्यासाठी संबंधित यंत्रचालकास एकतर्फी दोषी ठरवून निलंबित करण्यात आल्याचा आरोप मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने केला आहे. या घटनेमुळे यंत्रचालक प्रचंड तणावाखाली आहेत. त्यामुळे तज्ज्ञ समितीची स्थापना करून मोटर पंप वाहनाची तांत्रिक चौकशी करावी. समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत सदोष वाहने अग्निशमन दलातून वगळावी, अशी मागणी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने केली आहे. संघटनेने याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र पाठविले आहे. महापौर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button