विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी थेट आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करीत जोरदार घोषणाबाजी
![On the last day of the monsoon session of the legislature, the ruling party directly targeted Aditya Thackeray with loud slogans](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/uddhav-thackeray-4.jpg)
मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी थेट आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करीत जोरदार घोषणाबाजी केली. त्याला विरोधकांनीही ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला मिळणाऱ्या उत्फूर्त प्रतिसादाचे फलक फडकावत घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर दिले.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी खोक्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले होते. गुरुवारी मात्र दोन्ही गटांनी वेळ साधत एकमेकांविरोधात निदर्शने, घोषणाबाजी केली. अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले. सकाळी साडे दहाच्या सुमारास सत्ताधारी शिंदे गटाने विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली. लवासाचे खोके, एकदम ओके!, महसूलचे खोके, सोनिया ओके अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मात्र यावेळी एका पोस्टरवर आदित्य ठाकरेंचे व्यंगचित्र होते. आदित्य ठाकरेंची दिशा चुकली, अशा आशयाचे हे पोस्टर चर्चेचा विषय ठरले. सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनीही विधान भवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली.