आता नाना पटोले अयोध्येला जाणार, महंतांचे आमंत्रण स्वीकारले
![Now Nana Patole will go to Ayodhya, accepting the invitation of the mahants](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Now-Nana-Patole.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले असतानाच अयोध्येला भेट देण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. यामध्ये आता काँग्रेसही उतरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच आयोध्या दौरा करणार असून त्यांच्या पाठोपाठ शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेदेखील अयोध्या दौऱ्याची रूपरेषा आखत आहेत. त्यातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. महंत बृजमोहन दास यांनी अयोध्या दौऱ्याचे दिलेले आमंत्रण पटोले यांनी सोमवारी स्वीकारले.
अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सोमवारी या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी मुंबईतील टिळक भवन येथे पटोले यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी पटोले यांना अयोध्या दौऱ्याचे आमंत्रण दिले; ते पटोले यांनी स्वीकारले. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेऊन हा दौरा आयोजित केला जाणार असल्याचे कळते. साधारण जूनमध्ये तो होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘महंत बृजमोहन दास यांनी सोमवारी माझी भेट घेतली. या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यांनी या भेटीदरम्यान प्रभू श्रीरामाच्या दर्शनाचे आमंत्रण दिले. प्रभू श्रीराम माझे श्रद्धास्थान असून मी नक्कीच अयोध्येला जाईन’, असे पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. हा राजकीय दौरा नसेल. लवकरच या दौऱ्याची रूपरेषा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.