हिंदू विवाह कायद्याच्या बाहेर आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवबौद्ध तरुण-तरुणींनाही केंद्र सरकारच्या प्रोत्साहन योजनेचे आर्थिक लाभ
![Neo-Buddhist youth who marry inter-caste outside the Hindu Marriage Act also benefit financially from the Central Government's incentive scheme.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Ramdas-Athavle-1-780x470.jpg)
मुंबई : हिंदू विवाह कायद्याच्या बाहेर आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवबौद्ध तरुण-तरुणींनाही केंद्र सरकारच्या प्रोत्साहन योजनेचे आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबिवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोविण्यासाठी यशवंतराव प्रतिष्ठानच्या सभागृहात बुधवारी जनजागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आठवले यांनी आंतरजातीय विवाहासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन म्हणून प्रत्येक जोडप्यास अडीच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येत असल्याची माहिती दिली.
भारतातील जातीव्यवस्था निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाहास केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जाते. या योजनेत हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न झालेल्या आंतरजातीय जोडप्यांना लाभ देण्यात येतो. मात्र नवबौद्ध तरुण-तरुणींनी हिंदू विवाह कायद्यानुसार आंतरजातीय विवाह केला नसेल तर त्यांना या प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळत नाही, ही अडचण दूर करण्याबाबत आपल्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या स्तरावर विचारविनिमय सुरू असून त्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्राच्या अनुसूचित जातीच्या यादीत नवबौद्धांचा समावेश केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.