राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल झाले आहेत. छगन भुजबळ यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व्हायरल इंफेक्शनमुळे त्यांना रुग्णालयात ते दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आज (सोमवार) डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल इंफेक्शन झाल्यानंतर भुजबळ यांनी घऱगुती उपचार केले होते. यानंतर त्यांनी पक्षाच्या शिर्डी येथील शिबीरालाही उपस्थिती लावली होती. मात्र सोमवारी सकाळी त्रास वाढल्याने ते बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज संध्याकाळीच त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.
शरद पवारांना डिस्चार्ज
शरद पवार यांना ३१ ऑक्टोबरला प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांच्याच सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवस उपचारानंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार होता. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
“दिवाळीत किमान ५० हजार लोकांना शरद भेटले होते. लोकांना भेटल्यामुळे, बोलल्यामुळे न्यूमोनियाचा संसर्ग झाला आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक असून, इच्छाशक्तीच्या बळावर ते लवकर बरे होतात. मोठ्या आजारांना त्यांनी हरवलं असून न्युमोनिआ किरकोळ विषय आहे,” असा विश्वास माजी आरोग्यामंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांना भेटल्यावर व्यक्त केला होता.
दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरु असताना देखील शरद पवार यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिराला हजेरी लावली होती. शरद पवार डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डी येथे पक्षाच्या शिबिरासाठी दाखल झाले होते.