नवाब मलिकांची प्रकृती खालावली, स्ट्रेचरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल
![Nawab Malik's health deteriorated, J.J. Hospitalized](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Nawab-Maliks-health-deteriorated-J.J.-Hospitalized.png)
मुंबई| आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन देण्यास सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) विरोध केला आहे. मात्र, मलिक यांना रुग्णालयात उपचार घेऊन देण्यास आम्ही तयार आहोत, असे ‘ईडी’कडून विशेष न्यायालयात सांगण्यात आले. आता न्यायालयाकडून ५ मे रोजी मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे
मात्र, सध्या तुरुंगात असल्यामुळे नवाब मलिक यांची प्रकृती प्रचंड खालावल्याची माहिती समोर येत आहे. नवाब मलिक यांना सोमवारी स्ट्रेचरवर झोपवून मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून ते खूप आजारी आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांच्या वकिलांनी पीएमएलए न्यायालयात दिली. त्यामुळे नवाब मलिक यांना मानवतावादी दृष्टिकोनातून अंतरिम वैद्यकीय जामीन द्यावा, अशी विनंती करण्यात आली. यावर न्यायालय आता ५ मे रोजी काय निकाल देणार, हे पाहावे लागेल. जे.जे. रुग्णालयाच्या अहवालानंतर नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
नवाब मलिकांवर आरोप काय?
दरम्यान, नवाब मलिक यांच्याशी संबंधित १५ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर सक्तवुसली संचालनालयाने (ईडी) टाच आणली. मलिक हे सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधी गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटकेत आहेत. मुंबईतील पाचपैकी एक फ्लॅट हा मुनीरा प्लंबर यांच्या नावे आहे. मलिक यांनी मुनीरा प्लंबर यांना मेसर्स सोलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर औपचारिक नियुक्ती दिली. पण, वास्तवात ही कंपनी मलिक यांचे कुटुंबीय हे दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या सामंजस्याने चालवत होते, असे तपासात समोर आले आहे.
मुंबईतील पाच फ्लॅट तसेच व्यावसायिक जागेतून मिळणारे ११.७० कोटी रुपयांचे भाडे हे मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स सोलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडे वळवले जात होते. त्यामुळे या दोन कंपन्यादेखील गुन्ह्याचा भाग आहे. त्याच पार्श्वभूमीवर मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे.