१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास मुंबई पालिका सज्ज, केंद्राच्या नियमावलीची प्रतीक्षा
मुंबई – १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन मुलांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे. मुंबईत 15 ते 18 वयोगटातील 9 लाख लहान मुलांचं लसीकरण होणार आहे, यासाठी मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे.
कोरोनचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याने लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्युनिअर कॉलेजमध्ये देखील असणार लसीकरण केंद्रे असणार आहे. 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना सुलभ लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या 350 लसीकरण केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, लहान मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणे बाकी आहे. गाईडलाईन येताच दोन ते तीन दिवसांत लहान मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.
प्रसुतीगृह आणि महापालिकेची 350 लसीकरण केंद्रे याठिकाणी लहान मुलांचे लसीकरण होईल. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असेल. नीडलची साईज काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तसेच, मुंबई महापालिकेकडे पुरेसा लससाठा करण्यासाठी शीतगृह आहेतच. मात्र, लहान मुलांसाठीच्या लसीकरता वेगळ्या तापमानाची आवश्यकता असेल का याबाबतही गाईडलाईननंतर स्पष्टता येईल, असं सांगण्यात आलं आहे.