प्रदूषणाने मुंबई गुदमरली
![Mumbai is suffocated by pollution](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/778e45b36db4acd8e5f0a5d882af2ec31670383317205339_original-720x470.webp)
मुंबई । महाईन्यूज
पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा आली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा बिघडल्याचे चित्र आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. .
समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावला
मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या अतिखराब वर्गात पोहोचली आहे. वातावरणात पसरलेली धूळ आणि धुराचे कण यामुळं दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. या परिस्थितीमुळं मुंबईकरांना सध्या खोकला आणि घश्याचे त्रास जाणवू लागले आहेत. अशा परिस्थिती श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तापमानात अचानक झालेली घट आणि समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याचा मंदावलेला वेग यामुळं पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो यासारखी विकासकामंही युद्धपातळीवर सुरू असल्यानं हे प्रदूषण येत्या काळातही कायम राहणार आहे.
मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स 293
वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. सध्या मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स 293-खराब आणि 300-400 ‘अत्यंत खराब’ पातळीच्या जवळ पोहोचली आहे. ज्यामुळं मुंबईकरांना श्वसनाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. मागील आठवड्यात, मुंबईतील हवेची पातळी 232 आणि 270 च्या दरम्यान होती. त्यामुळं ती मध्यम पातळीवर घसरली होती. सध्या मुंबईचा AQI ‘खराब’ दर्शवण्यात आला असून पुढील दोन दिवस तो ‘खराब’च राहण्याची शक्यता आहे. असा अंदाज SAFAR च्यावतीनं सांगण्यात आला आहे. त्यामुळं सध्याच्या काळात खासकरून श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करणं फायद्याचं ठरेल.
प्रदुषणाची पातळी घसरण्याचं कारण काय?
प्रदुषणाची ही पातळी अचानक घसरण्यामागंच मुख्य कारण म्हणजे तापमानात झालेली घट आणि समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा कमी झालेला वेग हे आहे. यामुळं वाहनांमधून उत्सर्जित होणारा धूर आणि धूळ वातावरणात तसेच राहतात. त्यामुळं प्रदुषण वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. साधारणत: हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुंबईची हवा सर्वात जास्त प्रदूषित असते. यंदा मात्र नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा सर्वात प्रदूषित होता. ज्यात AQI ही गेल्या तीन-चार वर्षांपेक्षा जास्त होता. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तर मुंबईनं दिल्लीपेक्षा जास्त AQI नोंदवला होता.