मनसे आणि भाजपाची युती? आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल
भाजपा नेते आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरे यांनी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं होतं. गणेशोत्सवात राज ठाकरेंनी त्यांची भेटही घेतली होती. यामुळे मनसे आता भाजपासोबत युती करणार अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली होती. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत नवं राजकीय समीकरण पहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मनसे नेते मात्र आपण स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगत आहेत.





