TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

एमएमआरडीएच्या नवीन प्रकल्पांमध्ये सागरी महामार्ग दुर्लक्षित

पालघर : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एमएमआरडीए) माध्यमातून ठाणे, नवी मुंबई व पालघर जिल्ह्यातील १७ हजार कोटी रुपयांचे २१ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १०१० कोटी रुपये किमतीच्या दोन प्रकल्पांचा समावेश आहे. असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेमध्ये असणाऱ्या सागरी महामार्गाच्या उभारणीकडे मात्र एमएमआरडीएने दुर्लक्ष केल्याने याबाबत नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

प्रस्ताव एमएमआरडीएकडून प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर केले जाणार आहेत. यामध्ये पालघर तालुक्यातील मुरबे ते सातपाटी खाडीवर तीन किलोमीटर लांबीचा पूल (३६५ कोटी रुपये) तसेच वसई व पालघर तालुक्याला जोडण्यासाठी नारंगी ते टेंभीखोडावे- दातिवरे दरम्यान ४.५६ किलोमीटर लांबीचा (६४५ कोटी रुपये) पूल प्रस्तावित आहे. कामाला मंजुरी मिळाल्यास पालघर व वसई दरम्यान दळणवळण सोयीचे होऊ शकेल. झाई-बोर्डी-रेवस रेड्डी यादरम्यान प्रस्तावित असणारा सागरी महामार्ग डहाणू व पालघर तालुक्यात अपूर्ण अवस्थेत आहे. तारापूर कुरगाव-कुंभावली-दापोली पालघर दरम्यान असणाऱ्या या महामार्गाच्या टप्प्यात किमान दहा किलोमीटर अंतरासाठी भूसंपादन (१०० कोटी रुपये) प्रलंबित आहे. रस्त्यासाठी किमान ५० कोटी रुपये अपेक्षित आहे. रस्ता झाल्यास जिल्हा मुख्यालय गाठणे व डहाणू तालुक्यातून वसई तालुक्यापर्यंत सागरी मार्गाने जाणे सहज व सोपे होऊ शकेल. एमएमआरडीएने महामार्ग विकसित करण्यासाठी नव्याने निधी मंजूर करावा. अशी मागणी पुढे येत आहे.

तारापूर अणुऊर्जा केंद्रामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आणि दक्षिणेला असणाऱ्या उनभाट, पोफरण व दांडी या गावांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ आली तर आपत्कालीन मार्ग हा प्रकल्पलगत असल्याने ते शक्य होणार नाही. त्यावर तोडगा म्हणून दांडी ते नवापूर दरम्यान ६० कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल उभारण्याची अनेकवर्षांपासूनची मागणी आहे. या कामी एनपीसीआयएलचा सामाजिक दायित्व निधी देण्याची तयारी अणुऊर्जा प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने दर्शवली होती. मात्र सक्षम एजन्सी पुढे येत नसल्याने या प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. महामार्गावरून पालघर मुख्यालयाकडे येणारा रस्ता मनोर गावातून जातो. अरुंद रस्त्यांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून वैतरणा नदीवर नव्याने पूल उभारून मनोर गाव बायपास मार्गासाठीचा ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रलंबित आहे. पालघर येथून वसई व मुंबईकडे जाताना अनेक वाहन धुकटण-बहाडोली-दहिसर या मार्गाचा वापर करतात. येथील पाइपलाइन देखभाल दुरुस्तीसाठी एक पदरी पुलाच्या बाजूला नव्या पूलासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पालादेखील एमएमआरडीएने प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

रखडलेले मार्ग

सागरी भागाचा दळणवळण व देशाच्या संरक्षणदृष्टय़ा सागरी महामार्गाची आखणी करण्यात आली होती. धाकटी डहाणू येथील उड्डाणपुलापासून हा महामार्ग थेट तारापूर बायपास मार्गाला जोडला जाणार होता. त्याचे सर्वेक्षणदेखील झाले होते, मात्र कालांतराने डहाणूखाडी ते चिंचणी दरम्यानच्या रस्त्याला सागरी महामार्ग रस्ता असे संबोधले जाऊ लागले. त्याच पद्धतीने तारापूर येथून परनाळी-कुंभवली-दापोली असा बोईसर शहराला बायपास करणारा मार्ग प्रस्तावित असून या मार्गाचे भूसंपादन आजवर रखडले आहे. पालघर तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालय ते दापोली (चार किमी) तसेच तारापूर बायपास मार्ग (अडीच किमी) इतक्याच मूळ प्रस्तावातील सागरी महामार्गातील रस्त्याचे काम आजवर झाले आहे. या सागरी मार्गाची उभारणी झाल्यास किनारपट्टीच्या गावांमध्ये अरुंद रस्त्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकेल.

पालघर-वसई तालुका जोडणे गरजेचे

पालघर येथून विरार-वसई येथे जाताना वैतरणा नदी पात्र आड येते. राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे महामार्गापर्यंत जाण्यासाठी दहा ते वीस किलोमीटरचे अंतर कापून मोठा वळसा घालावा लागत आहे. सध्या प्रस्तावित पूल नारंगी मराळंबळपाडा ते टेंभीकडावे-दातीवर दरम्यान उभारण्याची शक्यता आहे. याच मार्गावर रोरो सेवा सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या दोन्ही व्यवस्था उपलब्ध झाल्यास वसई व पालघर तालुक्यांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button