#jayshreeram:शिवसेना नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंग बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन अयोध्येत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Vikram-Pratap-Singh-at-ayodhya.jpg)
अयोध्या : मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंग हे अयोध्येत दाखल झाले आहेत. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत पोहोचले. शरयू तीरावर ही माती ठेऊन त्यासमोर 492 दिवे लावणार आहेत.
“राममंदिराचं भूमिपूजन होत असल्यानं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार झालं आहे. त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील अयोध्येला तीन वेळेस येऊन गेले आहेत. त्यामुळे राम मंदिरात शिवसेनेनचं योगदान खूप मोठं आहे. त्यासाठी शिवसेना आपल्या पद्धतीनं मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त करणार आहे”, असं विक्रम प्रताप सिंग यांनी सांगितलं.
मीरा भाईंदर महापालिका नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंह यांनी राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज यांची त्यांच्या अयोध्येतील आश्रमात भेट घेतली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दूत म्हणून विक्रम प्रताप सिंह अयोध्येत आले आहेत.
उद्धव ठाकरे यांचे राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारे पत्र त्यांनी नृत्य गोपालदास महाराज यांना सुपूर्द केलं. या पत्रात शिवसेना ट्रस्ट तर्फे मंदिर निर्माणासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिल्याचा तपशील नमूद करण्यात आला आहे.