“मोदींच्या चेहऱ्यामुळेच भाजपाला गेल्या सात वर्षांपासून यश मिळतंय”; खासदार संजय राऊतांकडून जाहीर कौतुक
!["It is because of Modi's face that the BJP has been succeeding for the last seven years"; Public appreciation from MP Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Sanjay-Raut-Narendra-Modi.jpg)
मुंबई |
नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही असं शिवेसना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून यावेळी नाशिक येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधानसभेतील आकडा १०० च्या पुढे जावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही ते यावेळी म्हणाले. मोदींचा चेहरा न वापरता भाजपाकडून निवडणूक लढण्याच्या वृत्तावर बोलताना ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत असं मी मानतो. गेल्या सात वर्षात मोदींच्या चेहऱ्यामुळेच भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही”. पुढे ते म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी देशाचे नेते असून ज्या पक्षातून ते पुढे गेले आहेत त्यांना प्रत्येक निवडणूक त्यांच्या नावावरच जिंकावी असं वाटत असेल. अटलबिहारी वाजपेयींचाही फोटो सर्व ठिकाणी वापरला जात होता.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा आणि फोटोही कार्यकर्ते वापरत असतात. आदेश काढला म्हणून चेहरा वापरणं थाबंत नाही. हे शेवटी कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं”. “मोदींनी प्रचाराला जाताना पंतप्रधान म्हणून जाऊ नये आणि पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करु नये ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा यंत्रणेवर दबाब असतो. पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं आहे. मनमोहन सिंग किंवा इतर कोणीही असलं तरी पंतप्रधान म्हणून त्यांनी प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान असतात,” असं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपाकडून बैठका सुरु असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “भाजपाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हालचाली सुरु केल्या असतील तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अधिक समनव्याने काम करण्यासंबंधी एकत्रित बैठका सुरु केल्या आहेत. भाजपा राज्यातील प्रमुख आणि मोठा विरोधी पक्ष असून त्यांनी अशा बैठका घेणं अपेक्षित आहे”.