TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

म्हाडाच्या सोडत रकमेत वाढ? ; प्रस्ताव विचाराधीन, लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता

मुंबई : म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठीच्या अनामत रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या विचाराधीन आहे. त्यादृष्टीने म्हाडा प्राधिकरण आणि मुंबई मंडळाकडून चाचपणी सुरू आहे. ही रक्कम नेमकी किती असावी याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान घराच्या एकूण रक्कमेच्या ५ ते १० टक्के इतकी अनामत रक्कम वाढविण्याचा विचार म्हाडाचा असल्याची चर्चा आहे.

म्हाडाची संपूर्ण सोडत प्रक्रिया बदलण्याचे काम सध्या प्राधिकरणाकडून सुरू आहे. सोडत अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि सोडतीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. त्यातील अनेक बदल इच्छुकांना दिलासा देणारे आहेत. मात्र, सोडतीसाठी करावयाच्या अर्जासोबत अर्जदारांना उत्पन्न गटाप्रमाणे अनामत रक्कम भरावी लागते. सोडतीत अपयशी ठरलेल्या विजेत्यांना सोडतीनंतर काही दिवसांतच अनामत रक्कम परत केली जाते. विजेत्यांची अनामत रक्कम घरांच्या किमतीच्या रक्कमेत समाविष्ट केली जाते. सध्या मुंबई-ठाण्याच्या सोडतीसाठी अत्यल्प गटासाठी ५,००० रुपये, अल्प गटासाठी १०,०००रुपये, मध्यम गटासाठी १५,००० रुपये आणि उच्च गटासाठी २०,००० रुपये अशी अनामत रक्कम आहे. या अनामत रक्कमेनुसारच मुंबई मंडळाची शेवटची २०१९ची सोडत काढण्यात आली होती.

आता मात्र या अनामत रक्कमेत बदल, वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि ठाण्यातील घरांसाठी मोठय़ा संख्येने अर्ज सादर होत आहेत. स्पर्धा वाढत आहे. अशावेळी गरजू इच्छुक घरापासुन दूर राहत आहेत. त्यामुळे खरे गरजू सोडतीत सहभागी व्हावेत यासाठी अनामत रक्कम वाढविण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मुंबई मंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. ही वाढ किती असेल हे लवकरच निश्चित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान याबाबत झालेल्या एका बैठकीत काही अधिकाऱ्यांनी घराच्या एकूण रक्कमेच्या ५ ते १० टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून आकारावी असे मत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. लवकरच यासंबंधीचा निर्णय होणे अपेक्षित आहे.

ही रक्कम वाढल्यास सर्वसामान्यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. कारण अनेक अर्जदार घराच्या अपेक्षेने अधिक पर्याय निवडून एकापेक्षा अधिक अर्ज भरतात. पण अनामत रक्कम वाढल्यास अशा अर्जदारांना अधिक अर्ज करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button