ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत पावसामुळे मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत

मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. यामुळे राज्यातील नागरिक सुखावले आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सध्या मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, सातारा, सांगली या भागात दमदार पाऊस कोसळताना दिसत आहे.

मुंबईत दमदार पावसाला सुरुवात
मुंबईत सध्या मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. काल रात्रीपासूनच मुंबई शहरासह उपनगरातही चांगला पाऊस होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र दिसत होते. यामुळे मुंबईला दमदार पावसाची प्रतिक्षा होती. त्यातच शहराच्या तलावांमध्ये पाणी पातळी निच्चांकी स्तरावर पोहोचली होती. त्यामुळे सर्व मुंबईकर हे जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. तसेच मागील काही दिवस दडी मारुन बसलेल्या पावसामुळे उकाडाही वाढला होता. पण अखेर मुंबईत दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.

पहिल्याच पावसात मध्य रेल्वे कोलमडली
मुंबईत कोसळत असलेल्या पावसामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असली तरी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईत पावसामुळे मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वसई-विरारमध्ये पावसाचा जोर कायम
वसई विरार या ठिकाणही रात्रभर रिमझिम पाऊस कोसळताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. सध्या विरार ते चर्चगेट या पश्चिम रेल्वेवरील लोकल सुरळीत धावत आहेत. तसेच वाहतूक सेवेवरही कोणताही परिणाम पाहायला मिळत नाही.

पुण्यात धरण साखळी क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ
मुंबईसह पुण्यातही पावसाची संततधार कायम आहे. पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणात 5.87 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेले सहा दिवस सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ झाली आहे. खडकवासला धरण सापेक्षेत्रातील टेमघर, वरसगाव, पानशेत या धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणेकर सुखावले आहेत.

हवामान विभागाचा अंदाज काय?
कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच जळगाव, धुळे, सोलापूर या जिल्ह्यातील तुरळक क्षेत्रात पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button