अनिल देशमुख यांच्या दोन्ही अर्जांवर उद्या सुनावणी
![Hearing on both the petitions of Anil Deshmukh tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Hearing-on-both-the-petitions-of-Anil-Deshmukh-tomorrow.jpg)
मुंबई|मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (७२) यांनी त्यांच्या निखळलेल्या उजव्या हाताच्या बाबतीत खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून आवश्यक ते वैद्यकीय उपचार घेण्याची मुभा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर तुरुंगात घरचे जेवण मिळण्यासाठीही त्यांनी अर्ज केला आहे. या दोन्ही अर्जांवर उद्या, ४ मे रोजी सुनावणी घेण्याचे विशेष पीएमएलए न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निश्चित केले.
‘घरचे जेवण मिळण्याबाबत आमचा आक्षेप नाही. परंतु, खासगी रुग्णालयातील उपचारांबाबत आहे. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात आवश्यक ते उपचार होऊ शकतात’, असा दावा करत अर्जाला उत्तर देण्यासाठी अवधी देण्याची विनंती ईडीच्या वकिलांनी केली. तेव्हा त्याला उत्तर देताना ‘ईडीच्या मर्जीवर देशमुख यांच्या मूलभूत हक्काचा निर्णय होऊ शकत नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अन्वये जीवन जगण्याचा आणि चांगले आरोग्य व प्रतिष्ठेसह जगण्याचा प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आहे. आरोपींनाही तो हक्क असतो. त्यामुळे देशमुख यांच्या प्रकृतीचा अहवाल पाहूनच निर्णय होणे आवश्यक आहे’, असा युक्तिवाद अॅड. अनिकेत निकम यांनी मांडला. त्यानंतर न्या. रोकडे यांनीही ईडीला खडसावले. ‘तुम्ही केवळ विरोधाला विरोध म्हणून आक्षेप घेऊ नका. वैद्यकीय सुविधा मिळणे हा आरोपीचा हक्क आहे. त्यामुळे प्रकृतीचे अहवाल पाहून आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करून योग्य ती वाजवी भूमिका मांडा’, असे सांगून न्यायाधीशांनी दोन्ही अर्जांवर उद्या, बुधवारी सुनावणी ठेवली.