गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांविरोधात आरोग्य विभागाची मोहीम
![Health Department's campaign against absentee doctors](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/doctor-780x470.jpg)
मुंबई : गडचिरोलीच्या ग्रामीण रुग्णालयापासून ठाण्यातील ग्रामीण रुग्णालय ते प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी तपासणी मोहीम राबवली. रात्रीच्या वेळी कामावरील डॉक्टर हजर असतात का हे तपासण्यासाठी ही राज्यव्यापी मोहीम एकाच वेळी राबविण्यात आली होती.
रात्रीच्या वेळेतील डॉक्टर आरोग्य केंद्रात वा रुग्णालयात हजर असलाच पाहिजे, जेणेकरून गोरगरीब रुग्णांना उपचार मिळावे, या भूमिकेतून आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या तपासणीचे आदेश जारी केले होते. त्यानुसार राज्याच्या वेगवेगळय़ा भागांतील ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालयात जाऊन कामावरील डॉक्टर जागेवर उपस्थित आहेत का याची तपासणी करत होते. याबाबत मुंडे यांना विचारले असता, आरोग्य सेवा चोवीस तास मिळणे हा रुग्णांचा हक्क आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर जागेवर उपस्थित राहतात का हे तपासणे गरजेचे होते.
जवळपास ६० आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी करण्यात आली असून यात तेरा डॉक्टर कामावर उपस्थित नसल्याचे आढळून आले असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या तपासणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर काही डॉक्टरांनी दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी डॉक्टरांना राहण्याची योग्य व्यवस्था नसल्याचे सांगितले. जेथे निवासाची व स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नसेल तेथे ती उपल्ब्ध करून देण्यासाठी काम करावे, अशी अपेक्षाही या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.