Hanuman Chalisa Row: मनसेवर कारवाई; मुंबईत विभागाध्यक्षाला अटक, राज यांच्यावर गुन्हा दाखल होताच…
![Hanuman Chalisa Row: Action on MNS; As soon as the case was filed against Raj, the department head was arrested in Mumbai ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Hanuman-Chalisa-Row-मनसेवर-कारवाई-मुंबईत-विभागाध्यक्षाला-अटक-राज-यांच्यावर.jpg)
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला असतानाच अन्य ठिकाणीही पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. राज यांच्या आवाहनानंतर मुंबईतील घाटकोपर येथे मशिदीसमोर लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा लावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. हनुमान चालीसा वादात मनसे पदाधिकाऱ्याला झालेली ही पहिली अटक आहे. ( Hanuman Chalisa Row Latest Breaking News )
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबाद येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. त्यानंतर राज्य सरकार सतर्क झालं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज स्थितीचा आढावा घेतला व पोलीस दलाला निर्देशही दिले आहेत. त्यानंतर वेगाने पावले उचलली जात असून प्रक्षोभक भाषणासाठी राज यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी राज्यात प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात येत आहे. मनसेचे अनेक नेते व पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचे चांदिवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना अटक करून पोलिसांनी कारवाईचे पहिले पाऊल उचलले आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात सर्वप्रथम भोंग्यांचा मुद्दा उचलला होता. मशिदींवरील भोंगे हटवले जाणार नसतील तर मशिदींसमोर लाउडस्पीकर लावा आणि त्यावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवा, असे राज म्हणाले होते. त्यानंतर घाटकोपर येथे भानुशाली यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली होती. याप्रकरणी भानुशाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना आज बर्वेनगर स्मशानभूमी येथून पोलिसांनी अटक केली आहे. भानुशाली यांच्या चांदिवली येथील कार्यालयातून मोठ्या प्रमाणात लाउडस्पीकर्सही जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, औरंगाबाद येथील ‘राज’सभेचे पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातील पोलीस अलर्ट मोडवर आहेत. राज यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मनसेचे प्रमुख नेते भूमिगत होऊ लागले आहेत. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, संतोष धुरी हे नेते पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे.