ताज्या घडामोडीमुंबई

सण; राजकीय आंदोलनांमुळे पोलिसांचे सुट्ट्यांचे नियोजन बिघडले

मुंबई |  प्रतिनिधी

मे महिना सुरू झाला आहे… मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत… करोनानंतर दोन वर्षांनी सुट्ट्या घेऊन कुटुंबीयांसोबत बाहेर जाण्याचे पोलिसांचे नियोजन होते. परंतु लागोपाठ आलेले सण, राजकीय आंदोलने आणि त्यामुळे रद्द झालेल्या सुट्ट्या, यांमुळे पोलिसांचा हिरमोड झाला आहे. पोलिस कुटुंबीयांमध्येही नाराजीचा सूर आहे.

वर्षाच्या इतर महिन्यांच्या तुलनेत मे, जून या महिन्यांत फारसे सण, उत्सव नसतात. त्यातच मे महिन्यात मुलांना उन्हाळी सुट्ट्या असतात. सणावारांना कधीच घरी नसणारे पोलिस, महिला पोलिस याच महिन्यांमध्ये आपल्या कुटुंबीयांसह गावी, तसेच इतर पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करतात. मात्र राज्यात विशेषकरून मुंबईत राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापासून आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती, इस्टर संडे, रमझान ईद, असे सर्वधर्मीयांचे सण एकापाठोपाठ आले. त्यातच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला आणि त्यावरून पुन्हा वातावरण तंग झाले. एप्रिल महिना बंदोबस्तामध्येच गेला.

मे महिन्यात सुट्ट्यांचा बेत आखत असतानाच मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा प्रकाशझोतात आला. सर्व पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या. कर्तव्य आधी म्हणत आम्हाला सुट्टीवर पाणी सोडावे लागणार, असे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले. तर आम्ही अद्याप सुट्टीसाठी अर्ज केला नाही, पण सद्यस्थिती पाहता सुट्टी मिळेल, असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया एका उपनिरीक्षकाने व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button