ताज्या घडामोडीमुंबई

‘आयपीएल’ स्पर्धेदरम्यान पार्किंगसाठी ‘क्युआर कोड’ची सुविधा

नवी मुंबई | दहा वर्षांनंतर नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मैदानात इंडियन प्रमियर लीग अर्थात आयपीएलचे क्रिकेट सामने होत असून यासाठीची तयारी सुरू आहे. मात्र ज्या दिवशी सामना असेल त्या दिवशी शहरातील तसेच मैदान परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवणे हे वाहतूक पोलिसांपुढील मोठे आव्हान असणार आहे. यासाठी यावर्षी पहिल्यांदाच पार्किंगसाठी ‘क्यूआर कोड’ची सुविधा देण्यात आली आहे.

तिकिटावरील कोड स्कॅन करून आपली पार्किंग कुठे आहे हे शोधता येणार आहे. त्यामुळे पार्किंगसाठीची भटकंती व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे.ठाणे-बेलापूर मार्गालगत सेवा रस्त्यावर या मैदानाची दोन प्रवेशद्वारे आहेत. शिवाय पार्किंगसाठीचे प्रवेशद्वारही येथेच आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार हा रस्ता अन्य वाहनांसाठी बंद ठेवण्यात येईल व ही वाहतूक ठाणे-बेलापूर आणि नेरुळमधील अंतर्गत रस्त्यांवर वळवण्यात येणार आहे.आयपीएलमधील २० सामने हे डॉ. डी. वाय. पाटील नेरुळ येथील मैदानात होणार आहेत. यातील चार सामने दिवसा तर १६ सामने दिवस-रात्र असणार आहेत. या मैदानात ५५ ते ६० हजार इतकी प्रेक्षक क्षमता असून दीड ते पावणेदोन हजार वाहनांचा आंदाज आहे. डॉ. डी. वाय. पाटील मैदान प्रशासनाचे वाहनतळ आहे, मात्र त्याची क्षमता फक्त ५०० वाहनांची आहे. हे वाहनतळ फक्त महत्त्वाच्या व्यक्तींसाठी आरक्षित असणार आहे. त्यामुळे इतर प्रेक्षकांसाठी नेरुळ सेक्टर १९ येथील भीमाशंकर मैदान आणि रहेजा मैदानात वाहनतळ करण्यात आले आहे.

मात्र सामना पाहण्यासाठी पुणे, मुंबई उपनगर तसेच इतर ठिकाणांहून प्रेक्षक येणार आहेत. त्यांना वाहनतळ नेमके कुठे व कोणत्या रस्त्यावर आहे, याबाबत नेमकी माहिती मिळावी व वाहनतळ शोधण्यासाठी होणारी भटकंती व त्यामुळे होणारी वाहतू कोंडी टळावी यासाठी ‘क्यूआर कोड’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिकिटावरच क्यूआर कोड देण्यात येणार असून तो जिओ लोकेशनशी जोडलेला असेल. कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या वाहनाला पार्किंगसाठी जागा कुठे उपलब्ध करून देण्यात आली आहे, ते लोकेशन समजेल, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.

१३०० पेक्षा अधिक जणांचा बंदोबस्त

हे २० सामने शिस्तीत पार पडावेत, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलीस महासंचालकांकडून अतिरिक्त कुमकही देण्यात येणार आहे. याशिवाय २०० पेक्षा अधिक खाजगी सुरक्षारक्षक असणार आहेत. डॉ. डी. वाय. पाटील मैदान प्रशासनाचे ४०० सुरक्षारक्षक असणार आहेत. तीन पोलीस आयुक्त, १२ साहाय्यक पोलीस आयुक्त, ४५ पोलीस निरीक्षक, १२० पोलीस उप निरीक्षक, १२०० पोलीस कर्मचारी ज्यात २०० महिला कर्मचारी असा १३०० पेक्षा अधिक जणांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय राखीव पोलीस बळ, जलद गती पथक, दंगलविरोधी पथक तैनात असणार आहे. याशिवाय या मार्गावर अतिरिक्त सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button