वनविभागाच्या हद्दीत वसलेल्या मालाड पूर्वेतील वीज ग्राहकांना घरगुती दराने वीज पुरवठा : ऊर्जामंत्री यांनी दिले निर्देश
![Energy Minister instructs to supply electricity at domestic rate to electricity consumers in Malad East situated within the limits of Forest Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-26-at-10.40.01-AM.jpeg)
मुंबई | पश्चिम उपनगरातील मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा परिसरातील वनविभागाच्या हद्दीत वसलेल्या आंबेडकर व जामऋषी नगर वसाहतीतील वीज ग्राहकांना घरगुती दराने आकारणी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी वीजपुरवठादार अदानी इलेक्ट्रिसिटीला आज दिले.यामुळे या वसाहतीतील सुमारे साडे पाच हजार घरातील २५ हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यावेळी दिंडोशी मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू, महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण व अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी उपस्थित होते.
मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा परिसरातील वनविभागाच्या हद्दीत वसलेल्या आंबेडकर व जामऋषी नगर वसाहतीतील नागरिकांना वनविभागाच्या अडथळ्यामुळे वैयक्तिक घरगुती वीज जोडणी घेता येत नाही. त्यावर तोडगा म्हणून सामायिक मीटरद्वारे वीज पुरवठा होत असल्याने त्यांना स्लॅब रेटचा फायदा होत नाही. त्यामुळे त्यांना वाढीव दराने वीज बिल भरावे लागत असून ते न परवडणारे आहे.यावर लवकरात लवकर तोडगा काढून तेथील ग्राहकांना वैयक्तिक वीज जोडण्या देऊन घरगुती वीज दराची आकारणी करण्याचे निर्देश डॉ राऊत यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीला दिले. या बैठकीला स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी वन विभागाच्या अडथळ्यांमुळे वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे सांगितले. यावर सदर भागाचे सर्वेक्षण करून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत अहवाल ऊर्जा कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश डॉ राऊत यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीला दिले व वन विभागाच्या सहकार्याने यावर तोडगा निघेल असे मनोगत व्यक्त केले