गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
![Empress Lata Mangeshkar coronated; Information of Health Minister Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/lata-mangeshkar-.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, आता त्यांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, लता दीदी कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्येही सुधारणा होत असून, व्हेंटिलेटर सपोर्टही काढण्यात आला आहे.
व्हेंटिलेटर सपोर्ट काढला
गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. त्या व्हेंटिलेटरवर होत्या, मात्र आता त्यांचे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे. न्यूमोनिया आणि कोरोनातून लता दीदी आता बऱ्या झाल्या आहेत, अशी माहिती टोपेंनी दिली.
अशक्तपणामुळे उपचार सुरू
टोपे पुढे म्हणाले की, लता दीदी कोरोनातून ठीक झाल्या आहेत पण, सध्या ब्रेन इन्फेक्शन आहे. यामध्ये सुधारणा करण्याबाबत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या लता दीदी डोळे उघडत आहेत आणि थोडं बोलतही आहेत. त्या डॉक्टरांच्या उपचाराला चांगला प्रतिसादही देता आहेत. सध्या काही प्रमाणात त्यांना अशक्तपणा आहे, त्यावर उपचार सुरू आहेत, असंही राजेश टोपेंनी सांगितलं.
दरम्यान कालदेखील लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट देण्यात आली होती. लतादीदींची तब्येत हळूहळू सुधारत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत नजर ठेवून आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रतीत सामदानी यांनी महत्त्वाची माहिती दिली होती.