एकनाथ खडसे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये; आठवडाभरापासून उपचार सुरू
![Eknath Khadse at Bombay Hospital; Treatment continues for a week](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Eknath-Khadse.jpg)
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरापासून मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे हेदेखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले होते. माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता. त्यामुळे ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथ खडसे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तर भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरू आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती.